नागपुरातून परराज्यात जाणाऱ्या बसेसमध्ये वाढ

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - कोरोनामुळे अनेक दिवस एस.टी बस सेवा बंद होती. त्यानंतर मोजक्याच प्रवाशी क्षमतेवर बस सेवा सुरू करण्यात आली. सेवा सुरळीत सुरू झाल्यानंतर आता नागपूर आगाराकडून परराज्यात जाणाऱ्या बस फेऱ्यांमधे वाढ करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता रेल्वे गाड्याही मोजक्याच क्षमतेने धावत असल्याने नागपूर येथून परराज्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर आगाराकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, प्रवाशांचाही या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या नागपूर येथून १५ गाड्या परराज्यासाठी धावत आहेत. यात हैदराबाद, छत्तीसगड, रायपूर यासह इतर राज्यांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी होऊ नये म्हणून बस फेऱ्यांमध्ये आणि प्रवासी क्षमतेत वाढ करण्यात आल्याची माहिती आगाराकडून देण्यात आली आहे. सोबतच कोरोना विषयक सर्व खबरदारी घेऊनच या गाड्या सोडण्यात येत असल्याची माहितीही आगाराकडून देण्यात आली. यामुळे परराज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयाचा प्रवाशांकडून स्वागत होत आहे. शिवाय, इतर राज्यातूनही नागपुरात ५ बसेस येत असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात हैदराबाद आणि आदिलाबाद या राज्यातून बसेस येत असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच वाढीव बस फेऱ्यांमुळे एस.टी बस सेवेच्या अर्थकारणात भर होणार, असा आत्मविश्वास आगार प्रशासनाला आहे.