संत्र्याला कवडीमोल किंमत

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील संत्र्यांची ओळख आहे. वरुड, मोर्शी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. संत्र्यामध्ये 'सी' व्हिटॅमिन असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता मदत होते. त्यामुळे कोरोना काळात संत्र्यांना जास्त मागणी होती. मात्र, मृग बहार आल्यानंतर संत्रा कवडीमोल भावात विकला जात आहे.

वरूड तालुक्यातील संत्र्यामूळे नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या येथील शेतकरी गारद झाला आहे. संत्र्यांचे भाव कोसळल्यामुळे गेल्यावर्षी 30 हजार रुपये टनांनी विकला जाणारा संत्रा यंदा 12 हजार भावाने घ्यायलाही कुणी व्यापारी तयार नाही. केवळ 10 हजार रुपये टनांनी शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे. 

मागीलवर्षी अमरावतीमधील मोर्शी, वरुड या परिसरात दुष्काळ पडला होता. त्यामुळे अनेकांनी आपली झाडे मोडली. मात्र, उर्वरित संत्रा उत्पादकांनी कठीण परिस्थितीमध्ये झाडे जगवली. यातून मार्ग काढीत संत्र्यांला चांगला भाव येईल, या आशेत शेतकरी होता. मात्र, अचानक संत्र्यांचे भाव कोसळले आणि शेतकऱ्यांचा संत्रा शेतातच राहिला. सोयाबीन, कपाशीला हमीभाव ठरवून दिला, त्याचप्रकारे संत्र्यांला सुद्धा हमीभाव द्यावा, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी सरकारकडे केली आहे.