संजय राऊत हे शरद पवारांचे वकीलपत्र का घेतात? मुनगंटीवारांचा सवाल

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय 'अल्झायमर' म्हणजेच 'स्मृतिभ्रंशाचा आजार' झाला असल्याची सणसणीत टीका देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. अमित शाह, शरद पवार यांच्यात बैठक झाली होती का, यावर तेच दोघे बोलू शकतात. संजय राऊत हे शरद पवार यांचे वकीलपत्र का घेतात, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी फटकारलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारला ते कोर्टात टिकवता आले नाही. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले जे म्हणाले ते एका राजाचं नाही तर राज्यातील एका सामान्य नागरिकाचं मत आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींना कसे बाहेरचा संबोधू शकतात. ते कोट्यवधी भारतीयांना कुटुंब मानतात. ते बाहेरचे कसे होतील, असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना केला आहे.