बिबट्याने केली दोन जनावरांची शिकार, वनविभागाची शोधमोहीम जारी

November 29,2020

अमरावती : २९ नोव्हेंबर - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांच्या दोन जनावरांची शिकार बिबट्याने केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात असणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. यासाठी तिवसा वन विभागाचे अधिकारी कडाक्याच्या थंडीत रात्रपाळीने माळेगाव व तळेगाव ठाकूर या जंगल भागात गस्त घालून बिबट्याचा शोध घेत आहेत.

तालुक्यातील शेत शिवारात बिबट्याने गाई व बैलाची शिकार केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. तर पुन्हा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर या भागात बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, हे ठसे बिबट किंवा वाघाचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बिबट्याने 24 तासांत दोन जनावरांची शिकार केल्याने बिबट्याला जेरबंद करण्याकरिता तिवसा वनविभागाने कंबर कसली आहे. रात्रीच्या वेळी जंगल परिसरात वन अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहून बिबट्या आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी, असे आवाहन देखील अधिकाऱ्यांनी केले आहे. विंचुरी तळेगाव ठाकूर हा भाग जंगल परिसर असला, तरी याआधी जनावरांच्या शिकारी झाल्याच्या घटना फार कमी घडल्या आहेत. मात्र, गेल्या 24 तासातच दोन जनावरांची शिकार झाल्याने हा बिबट्या आहे की, वाघ अशी चर्चा या भागातील शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.