तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही - ओवैसींनी भरला दम

November 29,2020

हैद्राबाद : २९ नोव्हेंबर - ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. “तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही,” असं ओवेसी म्हणाले. एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं.

“तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल पण शहाराचं नाव हैदराबादच राहणारआहे. निवडणूक हैदराबाद आणि भाग्यनगरदरम्यान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हैदराबादच नाव बदलू नये तर एमआयएमलाच मतदान करा,” असं आवाहनही ओवेसी यांनी केलं. “ते (भाजपा) नाव बदलू इच्छित आहेत. त्यांना सर्व जागांची नावं बदलायची आहेत. तुमचं नाव बदललं जाईल पण हैदराबादचं नाव बदललं जाणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं म्हणतात. तुम्ही काय ठेका घेतला आहे का?,” असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.

“सध्या ही निवडणूक हैदराबादची आहे असं वाटत नाही. जसं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी दुसऱ्या पंतप्रधानांसाठी निवडणूक घेत आहोत असं वाटत आहे. मी करवन मध्ये एका रॅलीत होतो. तेव्हा सर्वांनाच या ठिकाणी बोलावण्यात आल्याचं समजलं. एका मुलानंही सांगितलं ट्रम्पना या ठिकाणी बोलावायला हवं होतं. त्याचं म्हणणंही योग्य होतं. आता केवळ ट्रम्पच येणं शिल्लक आहे,” असंही ते म्हणाले.

“मला काही लोकांनी विचारलं की हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? मी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.