नागपुरातील एम्समध्ये सुरु होणार दिव्यांग केंद्र

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - नागपुरातील अ.भा. आयुर्विज्ञान संस्था (एम्स) वेगाने अत्याधुनिक होत असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने येथील दिव्यांग केंद्राला हिरवी झेंडी दाखविली आहे. या केंद्रामुळे दिव्यांगांना आता मुंबई वा दिल्लीसारख्या महानगरात जायची गरज राहिलेली नाही.

 ‘एम्स' मधून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ फिजिकल मेडिसीन अँड  रिहॅबिलिटेशन, ग्रँट मेडिकल कॉलेज, नवी दिल्लीत वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज, कोलकातामधील इन्स्टिट्युट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन, चेन्नईत मद्रास मेडिकल कॉलेज, गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेज, तिरुअनंतपुरमचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जयपूरचे एसएमएस मेडिकल कॉलेज, त्रिपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अगरतळातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वाराणसीतील इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंसेस या देशातील फक्त अकरा ठिकाणी हे दिव्यांग केंद्र आहेत. नागपुरातील एम्स हे देशातील बारावे केंद्र ठरले आहे.

 वैद्यकीयच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील दिव्यांग विद्याथ्र्यांंच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी या केंद्रात होणार आहे. पूर्वी या कामासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई अथवा इतर केंद्रात दिव्यांग विद्याथ्र्यांना जावे लागत होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीचे मान्यताप्राप्त एकही दिव्यांग केंद्र मध्य भारतात नव्हते. एम्सला हे केंद्र होणार असल्याने मध्य भारतातील दिव्यांग वैद्यकीय विद्याथ्र्यांंच्या प्रमाणपत्राची येथेच पडताळणी करता येईल.

 नागपुरात मेडिकल, मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये असून येथे एन. के. पी. साळवे हे खासगी वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालयासह इतरही दोन ते तीन खासगी दंत महाविद्यालये, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासह इतरही काही खासगी आयुर्वेद महाविद्यालये आहेत. त्यासह विदर्भ व एकंदरितच मध्य भारतातील दिव्यांग विद्याथ्र्यांना एम्समधील हे दिव्यांग केंद्र उपयोगी पडणार आहे.