म्हशींनी वाघाच्या हल्ल्यातून गुराख्याला वाचवले

December 01,2020

चंद्रपूर, 1 डिसेंबर :  वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी झाल्याने दिसताच म्हशींनी वाघास मुकाबला करीत वाघाला पिटाळून लावून गुराख्याचे प्राण वाचविले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा आहे. नवरगाव उपवनक्षेत्राअतंर्गत येत  असलेल्या रत्नापूर बिटातील हुसेन प्रकल्प परिसरात सदर घटना घडली. मोरेश्‍वर पलके असे जखमीचे नाव आहे.

रत्नापूर बिटातील घनदाट जंगलांनी व्यापलेल्या कक्ष क्र. 40/240 मधील हुमन प्रकल्पाच्या पाळी जवळ रत्नापूर येथील मोरेश्‍वर पलके हा गुराखी म्हशी चारत असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक पट्टेदारा वाघाचे गुराख्यावर  हल्ला केला. आपल्या मालधन्यावर संकट बघताच म्हशींनीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाघावर प्रतिहल्ला केला. म्हशी वाघाचा मुकाबला करीत असल्याचे पाहून गुराख्याचा भाऊही मदतीला धावून आला. यामुळे वाघाने गुराख्याला  सोडून तिथून पळ काढला. देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यक्ष अनुभव वाघाच्या तावडीत सापडलेल्या गुराख्याला आला. गुराख्याचे प्राण मुका जनावर म्हणून संबोधल्या जाणार्‍या म्हशींनी वाचविण्याची गावात खमंग चर्चा आहे. जखमी  गुराख्याला प्रथम नवरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर शासकीय वाहनाने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.