अनोळखी व्यक्तीने केला पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

December 03,2020

नागपूर : ३ डिसेंबर - बाहेर गावावरून परतत असताना एका व्यक्तीवर अनोळखी इसमांनी लोखंडी रॉडने हल्ला करून जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीत घडली. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीला वाचविण्याकरिता गेले असता त्यांच्या पोटात चाकूने आरोपीने वार केला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रार्जशी राकेश डेकाटे (वय २३ वर्ष, रा. इतवारी, नागपूर), त्यांचे पती राकेश डेकाटे (वय ३३ वर्ष) व सोबत मुलगा वैष्णव (वय 0४ वर्ष) हे दुचाकीवर नागपूर येथे येत होते. दरम्यान, गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीत काटोल रोड, झू गेटच्या अलीकडे नागपूर येथे फिर्यादीच्या मुलाला उल्टी येत असल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. मुलगा उल्टी करत असताना अनोळखी आरोपी इसम त्यांच्या जवळ आला. त्याने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारले. यावेळी फिर्यादीचे पती हे फिर्यादीला वाचविण्यासाठी गेले असता आरोपीने आपल्या जवळील चाकूने फिर्यादीचे पती राकेश यांच्या पोटात मारून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी हा पळून गेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.