आता तुरुंगात चौकशीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

December 03,2020

नवी दिल्ली : ३ डिसेंबर - देशभरातील चौकशी यंत्रणा आणि पोलिसांसाठी सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्देश दिले आहेत. तुरुंगात चौकशीच्या ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंगसहीत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 

सीबीआय, एनआयए, अंमलबजावणी संचालनालय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स आणि सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफीस  यांच्या कार्यालयात आणि चौकशी केल्या जाणाऱ्या सगळ्या बंद खोलींत ऑडिओ रेकॉर्डिंग तसंच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

यासोबतच सर्व राज्यांच्या पोलीस स्टेशनमध्येही ऑडिओ रेकॉर्डिंगसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

पोलीस स्टेशनचं प्रवेश आणि निर्गमन द्वार, लॉक अप, कॉरिडोर, लॉबी एरिया, रिसेप्शन एरिया, सब इन्स्पेक्टर आणि इस्पेक्टर यांचे रुम, स्टेशनच्या बाहरेचा परिसर, वॉशरुमच्या बाहेरचा भाग इत्यादी भागांतही कॅमेरे लावण्यात यावेत, असंही कोर्टानं स्पष्ट केले आहे.  

प्रत्येक ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढच्या १८ महिन्यांपर्यंत उपलब्ध असायला हवं, असंही कोर्टानं म्हटलंय. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आदेशही जारी केलेत.