धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी

December 03,2020

धुळे : ३ डिसेंबर - विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. १ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीअंती भाजपाच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मात दिल्याचे स्पष्ट झाले. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. त्यामुळे भाजपाचा येथील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला.

अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याचे दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचेही चित्र दिसत आहे. कारण महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही. त्यामुळे या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात आलेले उमेदवार होते. तर अभिजीत पाटील भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीत खूपच ‘ड्रामा’ होता. अखेर गुरूवारी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झालं. भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या फरकाने विजयी झाले.