घ्या समजून राजे हो.....राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्केटिंग... किती गरजेचे...?

January 04,2021

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या 9 दशकांच्या वाटचालीत खूप काही चांगले केले आहे. संघाच्या इतर संल्गन संघटनानीही अनेक चांगली कामे केली आहे. मात्र या कामाचे योग्य असे मार्केटिंग कधीच झाले नाही. त्यामुळे या संघटनेच्या संदर्भात विविध समज गैरसमज पसरवले जात आहेत अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे दहा दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मार्गदर्शन करताना व्यक्त केली आहे. या संदर्भात आपण लवकरच एक पुस्तकही लिहिणार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केलेले आहे.

नितीन गडकरी हे बालवयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेलेे आहेत. त्यांच्या आजवरच्या जडणघडणीत संघाचा बराच वाटा राहिलेला आहे. हा वाटा गडकरींनी कधीही नाकारलेला नाही. आजही संघाबद्दल त्यांना निश्‍चितच अशी आपुलकी आहे. त्या आपुलकीतूनच त्यांनी हे वक्तव्य केले आहे हे निश्‍चित.

आपल्या भाषणातून गडकरींनी दोन महत्त्वाची सत्ये अधोरेखित केली आहेत. त्यातील पहिले वास्तव हे असे की संघाने आणि संघाच्या संलग्न संस्थांनी आजवर खूप चांगली कामे केली आहेत आणि दुसरे वास्तव असे की ही कामे लोकांपर्यंत पोहोचवलेली नाहीत.

पहिले वास्तव अगदी संघविरोधक सुद्धा नाकारणार नाहीत. प्रत्यक्षात ते भलेही संघावर भरपूर टीका करतील. वाटेल तसे खरे खोटे आरोप करतील. मात्र खासगीत ते संघाचे प्लस पाँईट्स कायम मान्य करतात. 45 वर्षाच्या पत्रकारितेत अनेक संघविरोधकांशी वेळोवेळी या विषयांवर माझी चर्चा झालेली आहे. संघ परिवाराने चांगली कामे केली  आणि करत आहे म्हणून तर आम्हाला पूर्ण ताकदीनीशी त्यांची बदनामी कशी करता येईल याचे नियोजन करावे लागते असे अनेक कट्टर संघविरोधकांनी मला खासगीत ऐकवले आहे. संघ म्हणजे काय आहे हे विचारण्यापेक्षा संघात या, संघात आल्याशिवाय संघ तुम्हाला समजणार नाही अशा आशयाचे एक संघगीत शिकवले जाते. या संघगीताला काही संघ स्वयंसेवकांजवळ मी विरोध दर्शवला होता. संघविरोधकांना संघ काय आहे आणि संघ काय करतो आहे तसेच काय करु शकेल याची पूरती कल्पना आली आहे त्यामुळेच ते संघाला पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना नव्याने संघ समजून घेण्याची काहीही गरज नाही. अशा संघविरोधकांना ते संघात आले काय किंवा न आले काय काही फरक पडणार नाही असे मत मी अनेकदा मांडतो.

संघ जे काही करतो ते चांगलेच करतो याची जाणीव शासनाला देखील कशी आहे याचे एक उदाहरण सुमारे 50 वर्षांपूर्वी संघाचे ज्येष्ठ विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी एका भाषणात सांगितले होते. 1948 साली संघावर पहिली बंदी आली.  त्यामुळे दैनंदिन शाखा लागणे बंद झाले. दैनंदिन संपर्क हे संघाचे प्रमुख तत्त्व आहे. मात्र दैनंदिन शाखा लागणे बंद झाल्यामुळे स्वयंसेवकांचा दैनंदिन संपर्क होत नव्हता. त्यावेळी राजस्थानातील एका शहरातील संघ स्वयंसेवकांनी दररोज भेटण्यासाठी एक फूटबॉल क्लब सुरु केला. अल्पावधीत या क्लबमध्ये सदस्य संख्या वाढली आणि मग क्लबला निवडणूका घेऊन रितसर नोंदणी करण्याचे ठरले. त्यानुसार निवडणूका झाल्या. या निवडणूका अत्यंत शांतपणे कोणताही गोंधळ न होता आणि वादावादी भांडणे न होता पार पडल्या. ही माहिती त्या शहरातील पोलिसांना कळताच ते सतर्क झाले. त्यांनी लगेचच चौकशी केली आणि हे सर्व संघाचेच लोक असून या माध्यमातून दररोज एकत्र येतात हे कळताच त्यांनी ज्या सर्व पदाधिकार्‍यांना तत्काळ अटक केली. हा किस्सा सांगून दत्तोपंत म्हणाले की, निवडणूका भांडणे न करता होतात, आणि कोणतेही वाद न होता क्लबचे कामकाज चालते म्हणजे हे संघ स्वयंसेवकच असले पाहिजे याची पोलिसांनाही खात्री पटली होती. त्यामुळेच पोलिसांनी लगेच कारवाई केली असे सांगून संघ चांगलेच काम करतो याची सर्व जगाला कशी खात्री पटली आहे याची प्रचिती अशी येत असल्याचे दत्तोपंतांनी स्पष्ट केले होते.

एकूणच संघाने तर गेल्या 9 दशकात राष्ट्रीहत सर्वतोपरी काम केलेच हे कोणी नाकारू शकत नाही. त्याचबरोबर संघाने विविध क्षेत्रात ज्या संघटना उभारल्या त्यांनीही चांगलीच कामे केली आहेत याबद्दल दुमत होऊ शकत नाही. प्रत्येक आपत्तीच्या वेळी मग ती राष्ट्रीय असो किंवा स्थानिक तिथे संघ स्वयंसेवक तत्काळ धावून गेला आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. अगदी नुकतीच जगभरात आलेली कोरोनाची आपत्ती जरी बघितली तरी भारतात या प्रकरणात संघ स्वयंसेवकांचे आणि संघाशी संलग्न संस्थांच्या कार्यकर्त्यांचे योगदान निश्‍चितच लक्षणीय राहिलेले आहे.

गडकरींनी आपल्या भाषणात मांडलेले दुसरे वास्तव असे की संघाने किंवा संघ परिवारातील संघटनांनी आपले मार्केटिंग पुरेसे केलेले नाही. गडकरींच्या या मताशी व्यक्तिशः मी निश्‍चितच सहमत आहे. 1925 साली संघाची स्थापना झाली. त्यानंतर पुढली 23 वर्षे संघ प्रसिद्धीपासून पूर्णतः दूर होता. 1948 मध्ये संघावर पहिल्यांदा बंदी आली. त्यावेळी देशभरातील सर्व प्रसिद्धी माध्यमे (त्या काळात फक्त वृत्तपत्रेच होती) संघाच्या विरोधातच बोलत होती. संघाची बाजू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाजवळ कोणतीही व्यवस्था नव्हती.

या काळात संघावरील बंदी हटल्यानंतर संघाने या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. त्याच काळात संघ विचारांची वृत्तपत्रे आणि नियतकालिके सुरु करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर पांचजन्य हे हिंदी साप्ताहिक, ऑर्गनायर्झर हे इंग्रजी साप्ताहिक सुरु झाले. त्याचबरोबर प्रांत स्तरावर विविध भाषांमध्ये नियतकालिके आणि दैनिके सुरु करण्याचा प्रयत्न झाला. मध्यप्रदेशात स्वदेश हे हिंदी दैनिक सुरु झाले. तर महाराष्ट्रात  तरुण भारत हे मराठी दैनिक सुरु झाले. या सर्व नियतकालिकांना जाहिरातींचा योग्य असा पुरवठा व्हावा यासाठी त्या काळात स्व. भाऊराव देवरसांच्या नेतृत्वात एक जाहिरात संस्थाही मुंबईत सुरु करण्यात आली होती  अशी माहिती तत्कालिन मंडळींनी दिली आहे.

असे असले तरी संघाचे हे प्रयत्न मर्यादित स्वरुपातच राहिले. सर्वसाधारण परिस्थितीत संघाचे प्रसिद्धीपासून दूर राहण्याचेच धोरण कायम होते. नंतरच्या काळात आकाशवाणी आणि दूरदर्शन ही माध्यमे सक्रिय झाली. या काळात चित्रपट, नाटक, कथा, कादंबरी हे विविध प्रकारही जनमानसावर परिणाम करणारे ठरत होते. मात्र संघाची सकारात्मक बाजू दाखवणारे चित्रपट किंवा नाटके कधी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. उलटपक्षी अनेक कलाकृतींमधून संघावर टीका कशी केली जाईल हेच बघितले गेले. त्याचा प्रतिवाद करून संघाची सकारात्मक बाजू जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा संघाकडून कधीच प्रयत्न झाला नाही. मला आठवते मी शाळेत असताना एका थोर मराठी साहित्यिकाने लिहिलेल्या एका कादंबरीत संघावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्या काळात मी संघाच्या काही ज्येष्ठ मंडळींच्या लक्षात ही बाब आणूनही दिली होती. मात्र त्यावर काही फारसे घडले नाही. आताही गत 15 वर्षात मराठीतील एका नामवंत साहित्यिक आणि पत्रकाराने विद्यमान राजकारणावर लिहिलेल्या दोन मराठी कादंबर्‍यांमध्ये संघावर अनावश्यक टीका केली होती. मात्र त्याचाही प्रतिवाद कधीच झाला नाही. तसे बघता संघ परिवारात अनेक विद्वान मंडळी सहभागी झालीत. त्यात अनेक साहित्यिकही होते. त्यांना सुचवून जर संघाची सकारात्मक बाजू मांडणारे लेखन झाले असते तर जनमानसावर सकारात्मक परिणाम निश्‍चितच झाला असता. संघाशी संबंधित अनेक मंडळी चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रातही कार्यरत आहेत. मात्र त्यांचा योग्य उपयोग हवा तितका केला गेला नाही असा प्राथमिक निष्कर्ष काढता येतो. जर या सर्वांचाच सकारात्मक उपयोग करून घेतला असता तर संघाचे प्रतिमासंवर्धन अधिक चांगले झाले असते.

गत 30-40 वर्षात सर्वत्र प्रवक्ते नेमण्याची पद्धत सुरु झाली आहे. या प्रवक्त्यांची जबाबदारी ही ज्या संघटनेचे ते प्रवक्ते आहेत त्या संघटनेबाबत योग्य माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची असते. मात्र संघाने सुरुवातीच्या काळात असा कुणीही प्रवक्ता ठेवला नव्हता. इतकेच काय पण संघाचे वरिष्ठ अधिकारी फारसे कधी माध्यमांशी संवाद साधत नव्हते. 21व्या शतकाच्या सुरुवातीला संघाने केंद्रीय प्रवक्ते नेमण्याचा प्रयोग केला त्या काळात स्व. मा.गो.वैद्य आणि राम माधव हे दोघे केंद्रीय प्रवक्ते होते. काही काळ या दोघांनी काम केले. नंतर या दोघांवरही भिन्न भिन्न जबाबदार्‍या दिल्या गेल्या आणि नंतर कोणीच प्रवक्ता नेमला गेला नाही. आजही संघाचा कुठेही प्रवक्ता असल्याचे माझ्यातरी माहितीत नाही.

गत 25 वर्षांपासून जगभर वृत्तवाहिन्या सुरु झाल्या आहेत. या वृत्तवाहिन्या जनमानसावर बरावाईट परिणाम करत असतात. मात्र 1950 साली संघ विचाराच्या वृत्तपत्रांचा विचार करणार्‍या संघपरिवाराने आपल्या वृत्तवाहिन्या असाव्या असा प्रयत्न केल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. त्याचपाठोेपाठ समाज माध्यमांचाही पुरेसा उपयोग संघपरिवाराने केलेला दिसत नाही.

या सर्व पार्श्‍वभूमीवरच गडकरींनी आपली खंत व्यक्त केली आहे. 1925 साली स्थापन झालेल्या संघाने गत 95 वर्षात अनेक चांगली कामे केली आहेत. याच कालखंडात आपल्या देशात आलेल्या इतर विचारधारा कालप्रवाहात नामशेष झाल्यात. काही विचारधारा आज आचके देत आहेत. अशावेळी संघ वाढतोच आहे. मात्र त्याचवेळी संघावर प्रचंड टीकास्त्र सोडली जात आहेत. संघाला जास्तीत जास्त बदनाम कसे करता येईल आणि या देशातील प्रमुख खलनायक कसे ठरवता येईल हाच प्रयत्न संघविरोधकांकडून केला जात आहे. मात्र त्याचा हवा तसा प्रतिवाद होताना दिसत नाही.

बोलणार्‍याची बोरेही खपतात आणि न बोलणार्‍याची सफरचंद आणि आंबेही विकली जात नाहीत अशा आशयाची एक मराठी म्हण आहे. ही बाब खरी आहे. संघाने अनेक चांगली कामे केलीत मात्र ती कामे लोकांपर्यंत पोहचतच नाही आणि त्याचवेळी संघाचे विरोधक मर्यादा सोडून संघाची बदनामी करण्यात धन्यता मानतात. दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान गोबेल्स नावाच्या प्रचारतज्ज्ञाने एकच खोटे दहादा सांगितले तर तेही खरे वाटते असे तत्त्वज्ञान मांडले होते. तेव्हापासून गोबेल्सचे प्रचारतंत्र हा शब्दप्रयोग रुढ झाला. संघविरोधकांनी गेली अनेक वर्ष हेच प्रचारतंत्र वापरले आणि आजही तेच तंत्र वापरले जाते आहे. मात्र त्याचा प्रतिवाद करून संघाकडून बाजू मांडण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे संघाचे समर्थक ज्या प्रमाणात वाढायला हवे त्या प्रमाणात वाढतांना दिसत नाहीत हे वास्तव नाकारता येत नाही.

हीच गडकरींची खंत त्यांनी जाहीररित्या बोलून दाखविली आहे. यावर संघ परिवाराने विचार करायला हवा आणि पावले उचलायला हवीत. आक्रमक मार्केटिंग करणे हा संघपरिवाराचा स्थायी भाव नाही हे मान्य मात्र किमान आपल्यावर होणारे नकारात्मक आरोप हे खोडले जायला हवेत आणि आपण जे काही चांगले करतो आहे ते लोकांपर्यंत पोहोचायला हवे ही काळजी घेतली जायला हवी.

आज काही न करताही लोक स्वतःची खरी खोटी प्रसिद्धी करून घेतात. मार्केटिंगच्या नावावर भ्रामक प्रतिमा तयार करतात. तसे संघाने करावे असे कुणीही संघसमर्थक म्हणणार नाही मात्र संघाने आपली वास्तव प्रतिमा जनसामान्यांसमोर विविध माध्यमांद्वारे कायम येत राहील याची व्यवस्था करावी इतकेच एक संघाचा हितचिंतक म्हणून गडकरींनी सुचवले आहे. तेच मलाही सुचवायचे आहे.

 

 

  तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क.ः घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/इश्रेससशीर्ईंळपरीहझरींहरज्ञ या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

                                                  -अविनाश पाठक