उपअभियंत्याला लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

January 13,2021

अमरावती : १३ जानेवारी - बांधकामाचा कार्यरंभ आदेश काढण्यासाठी कंत्राटदाराला लाच मागितल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातल उपअभियंता व शिपायला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  दुपारी 5 वाजता केलेल्या कारवाईत ताब्यात घेतले. 

संध्या मेश्राम असे महिला उपअभियंत्याचे व अण्णा वानखडे असे शिपायाचे नाव आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकामाचे कंत्राट घेणार्या कंत्राटदाराला मंजुर झालेल्या कामाचा कार्यरंभ आदेश पाहिजे होता. त्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर 30 हजार देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने सापळा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्यानुसार सदर कंत्राटदार मंगळवारी पैसे घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग परिसरात पोहचला. तेथे शिपायी अण्णा वानखडे यांनी त्याच्याकडून लाच स्विकारली. तेवढ्याचत एसीबीच्या पथकाने त्याला पकडले. चौकशीअंती त्याने सर्व प्रकार सांगितला. लाचेची रक्कम उपअभियंता मेश्राम यांच्या टेबलच्या कप्यातून जप्त करण्यात आली. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांचीही कसून चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.