गर्भवती माता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत

January 17,2021

अमरावती : १७ जानेवारी - मेळघाटात आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय सेवा देण्याचा दावा होत असला तरी माता मृत्यूचा दर कमी होण्याची शक्यता वाटत नाही. दोन दिवसापूर्वी खामदा गावातील पहिली वेळ असलेली माता धारणी उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचण्यापूर्वीच मरण पावल्याने आरोग्य यंत्रणेविरुद्ध असंतोष वाढलेला आहे. 

धारणीपासून 40 किमी अंतरावरील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणार्या खामदा येथील आदिवासी मातेची प्रसूती 5 दिवसापूर्वी घरातच करण्यात आली होती. सविता मोरेकर, वय 21 असे तिचे नाव आहे. प्रसूतीनंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने तातडीने तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणतांना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. बाळ मात्र सुखरुप आहे.

 उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सविता मोरेकरला प्रथमच गर्भधारणा झालेली होती व पहिल्या प्रसूतीतच मरण पावल्याने पुन्हा आरोग्य यंत्रणेबाबत शंका निर्माण होत आहे. घरात प्रसूती करण्यासाठी कोणत्या कारणांचा समावेश होता, हा तपासाचा विषय आहे. गर्भधारणा झाल्यापासून योग्य तपासणी व समुपदेशनाच्याअभावी घरात प्रसूती झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसूतीनंतर पाच दिवस निघाले, तरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कोणत्या कामात होते, या विषयी उलट सुलट चर्चा होत आहे. माता मृत्यू किंवा अर्भक मृत्यूसाठी थोड्या का प्रमाणात होईना आरोग्य यंत्रणा जबाबदार असतेच, म्हणून धारणी तथा चिखलदरा तालुक्यात कर्मचार्यांमध्ये सेवेचा भाव जागृत करणे आवश्यक आहे.