अण्णा हजारेंची भाजप करणार समझोत्याची बोलणी

January 17,2021

अहमदनगर: १७ जानेवारी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याऐवजी आता पूर्वी राज्यात कृषी मंत्री रहिलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना चर्चेसाठी पुढे केले आहे. विखेंनी हजारे यांची भेट घेऊन त्यांचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले. गरज पडल्यास दिल्लीतील नेत्यांशीही हजारे यांचा संपर्क करून देण्याची भाजपची योजना आहे.

हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री महाजन यांच्या मार्फत त्यांच्याशी चर्चा सुरू केली. मागील दोन आंदोलनांत महाजन यांनी शिष्टाई केली होती. यावेळीही त्यांनी सुरवात केली होती. मात्र, जे नेते चर्चेसाठी येतात, त्यांना आमच्या मागण्यांविषयी आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांविषयीची माहिती कमी आहे, असे वक्तव्य हजारे यांनी केले होते. दोन दिवसांपासून हजारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता भाजपने आणखी सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी केलेल्या मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यादृष्टीने झालेल्या चर्चेत आण्णांनी केलेल्या सूचना केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचविण्यात येणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने विखे पाटील यांना हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. राळेगणसिद्धी येथे हजारे आणि विखे पाटील यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. यामध्ये केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे, स्वामीनाथन आयोग, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा या विषयांवर चर्चा झाली. चर्चा सुरू असताना विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून हजारे यांचा फडणवीस यांच्याशी संपर्क करून दिला. पुढील आठवड्यात याबबात चर्चेची पुढची फेरी होणार आहे. यासाठी स्वत: फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दिल्लीतील नेत्यांशीही हजारे यांचा संपर्क करून दिला जाऊ शकतो. चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी सांगितले, ‘आण्णांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. कृषी क्षेत्राशी संबधित त्यांनी केलेल्या सर्वच सूचना केंद्रीय नेतृत्वापर्यंत आम्ही पोहचविणार आहोत. या चर्चेतूनच यशस्वी मार्ग निश्चित निघेल असा आपल्याला विश्वास वाटतो.’

दरम्यान, हजारे यांच्या पत्रांना दिल्लीतून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यांनी आंदोलनासाठी जागा मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे, त्याही उत्तर मिळालेले नाही. यासंबंधी हजारे यांनी दोन दिवसांपूर्वीच संताप व्यक्त करून जागेची परवानगी मिळाली नाही, तर जागा मिळेल तेथे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील आंदोलनाच्यावेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारला जनतेने चांगलाच धडा शिकविला होता, याची आठवणही हजारे यांनी मोदी सरकारला करून दिली आहे एका बाजूला दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपायला तयार नाही, अशात हजारे यांचे दुसरे आंदोलन उभे राहू नये. उलट अण्णांचे समाधान झाले तर त्याचा फायदा घेऊन दिल्लीतील आंदोलनातही तोडगा काढता येऊ शकतो का, याची चाचपणी करून भाजपने हजारे यांच्या बाबतीत वेगाने हालचाली सुरू केल्याचे दिसून येते.