पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीला वर्षभराने केली अटक

January 17,2021

नागपूर : १७ जानेवारी - गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाले. नरेश महिलांगे, असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील छूईखदान परिसरातून अटक केली. त्याच्यावर १६ गुन्ह्यांची नोंद असून नागपूर शहरात झालेल्या दोन मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.

नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार होता. नोव्हेंबर महिन्यात त्याला शहरातील हुडकेश्वर येथील गुन्ह्यात पकडण्यात आले होते. त्यावेळी आरोपी नरेशला कोविड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी मेडीकल रुग्णालयातील कोवीड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान ९ नोव्हेंबरला तो पळून गेला होता. तेव्हापासून नरेश फरार होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर एक तपास पथक तिकडे रवाना करण्यात आले होते. पोलिसांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपीला अटक केली. 

आरोपी नरेश महिलांगे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. चोरी केलेला मुद्येमाल त्याने सहकारी आरोपी मुकेश रघुनाथ जांभुळकर याच्याकडे असल्याचे सांगितले. मात्र, मुकेश हा सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पुढे आली. त्याला अटक झाली तेव्हा लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण दोन गुन्हे उघडकीस आले होते. त्यानुसार आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची माहिती घेतली असता सदर आरोपी हा नागपूर शहर, नागपूर ग्रामीण व गोंदीया शहर मिळून एकूण १४ गुन्ह्यात सध्या फरार होता. पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यातील एकुण ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.