तांडव वेबसीरीजमुळे रंगले राजकीय तांडव

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - ‘तांडव’ या वेबसीरीजमुळे सध्या चांगलाच राजकीय तांडव रंगले  असून भाजपाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय माहिती व प्रासरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार केली असून ‘तांडव’वर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात कोटक म्हणाले, सध्या प्रामुख्याने तरुण वर्गामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म खूपच प्रसिद्ध झाला आहे. हा प्लॅटफॉर्म सध्या सेन्सॉरमुक्त असल्याने याचा बऱ्याचदा निर्माते गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे आता ओटीटीवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे सेक्स, हिंसाचार, ड्रग्ज, शिवीगाळ, द्वेष आणि अश्लिलतेने भरललेल्या असतात. काहीवेळा त्यातून हिंदूंच्या आणि धार्मिक भावना दुखावल्या जातात.

देशभरातील नागरिकांमध्ये सध्या चर्चेत असलेल्या तांडव या वेब सीरीजबाबत मी नुकतंच ऐकलं आहे की, यांतून हिंदू देवता आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे चित्रण करण्यात आलं आहे. त्यामुळे माझं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विनंती आहे की, या गोष्टी टाळण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर तातडीने नियंत्रण यंत्रणा स्थापित करावी. त्याचबरोबर ‘तांडव’ या वेब सीरीज बंदी आणण्यात यावी.

दरम्यान, भाजपाचे आमदार राम कदम यांनी रविवारी दुपारी घाटकोपर पोलीस ठाण्यात तांडवच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.