गोंडवाना विद्यापीठ इतरत्र हलविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील - डॉ. देवराव होळी

January 19,2021

गडचिरोली : १९ जानेवारी - अथक प्रयत्नानंतर गडचिरोली झालेले गोंडवाना विद्यापीठ जिल्ह्याबाहेर इतरत्र स्थलांतरित केल्यास राज्य सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे शासनाने कोणत्याही परिस्थितीत गोंडवाना विद्यापीठ स्थलांतरित करण्याचा विचारही करू नये, असा इशारा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिला आहे. यासंदर्भात महामहीम राज्यपाल यांची २१ जानेवारीला मुंबई येथे भेट घेणार असून त्याबाबत त्यांना अवगत करणार असल्याचे आ. होळी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

मागील काही दिवसांपासून गोंडवाना विद्यापीठाच्या स्थलांतराची मागणी गडचिरोली जिल्ह्याबाहेरील लोकप्रतिनिधींद्वारे करण्यात येत आहे. गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षल प्रभावित जिल्ह्यात अतिशय विचारपूर्वक गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. परंतु जिल्ह्याबाहेरील काही तत्वे विद्यापीठाच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करून विद्यापीठाच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. विद्यापीठाचे काम चांगले होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत व त्याच आधारावर विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्याबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी करीत आहेत. ही मागणी गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय करणारी असून ती खपवून घेतली जाणार नाही. राज्य सरकारने विद्यापीठाच्या स्थलांतराचा विचारदेखील केल्यास संपूर्ण जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल. सरकारने असा विचारसुद्धा करू नये, असा इशारा आ. डॉ. होळी यांनी राज्य सरकारला दिला आहे.