मांजामुळे महिला पोलीस जखमी

January 19,2021

नागपूर : १९ जानेवारी -  मांजाने गळा कापल्याने प्रणय ठाकरे या तरुणाच्या मृत्यूची घटना ताजी असताना  मांजामुळेच प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलिस जखमी झाली. वेळीच तिने गळ्याभोवती आवळलेला मांजा हाताने काढल्याने अनर्थ टळला. मात्र यात तिचा हात कापला गेला. आरती पाटील, असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल असल्याने सोमवारी त्यांची हिंगणा पोलिस स्टेशनअंतर्गत ड्युटी लावण्यात आली. सकाळी त्या मोपेडने जात होत्या. प्रतापनगर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावरच त्यांच्या अंगावर मांजा पडला. तो गळ्याभोवती आवळला. आरती यांनी सावधगिरी बाळगत वेळीच गळ्याभोवती आवळलेला मांजा हाताने काढला. मांजाने त्यांचा हात कापला गेल्या. त्यांनी प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. प्रतापनगर पोलिसांनी लगेच त्यांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणाची नोंद घेत प्रतापनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.