ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्याबाबत दिल्ली पोलिसांनी निर्णय घ्यावा - सर्वोच्च न्यायालय

January 19,2021

नवी दिल्ली : १९ जानेवारी - शेतकरी संघटनांची ट्रॅक्टर रॅली हा कायदा व सुव्यवस्थेचा भाग असून, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कुणाला परवानगी द्यायची, याबाबतचा निर्णय दिल्ली पोलिसांनाच घ्यायचा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने  स्पष्ट केले.

शेतकर्यांची प्रस्तावित ट्रॅक्टर रॅली आणि सध्या सुरू असलेले आंदोलन प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात गोंधळ निर्माण करण्याचाच एक भाग असल्याने, शेतकर्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. एल. एन. राव आणि न्या. विनीत सरन यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने उपरोक्त मत व्यक्त केले.

पोलिसांनी काय करायचे, हे देखील आम्हीच सांगायचे काय? हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने, नेमके काय करायला हवे, हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. याबाबतचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, असेही न्यायालयाने महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांना सांगितले.

प्रजासत्ताक दिनी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर स्थिती कशी हाताळायची, याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. प्रत्येक गोष्ट आम्हीच सांगायला हवी, असे आवश्यक नाही, असेही न्यायालयाने वेणुगोपाल यांना सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी आम्ही २० जानेवारी रोजी करणार आहोत.

जेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी पहिली जबाबदारी पोलिसांचीच असते. न्यायालयाची भूमिका नंतर येत असते. तुम्ही मात्र एकदम न्यायालयाकडेच धाव घेतली. पोलिसांना त्यांचे कार्य करू द्या. पोलिसांच्या अधिकारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.