शेतकरी नेते गुरनामसिंग चादुनी यांना केले संयुक्त किसान मोर्चातून निलंबित

January 19,2021

नवी दिल्ली : १९ जानेवारी - जैन संसदेचे आयोजन करण्यासाठी दिल्लीत राजकीय नेत्यांच्या भेटी घेणारे शेतकरी नेते गुरनामसिंग चादुनी यांना संयुक्त किसान मोर्चामधून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शेतकरी संघटनांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.

भारतीय किसान मोर्चाचे प्रमुख असलेले चादुनी यांना सात सदस्यीय शिस्तपालन समितीपुढे हजर होण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, उद्या मंगळवारी होणार्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत सहभागी होण्यापासूनही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

शेतकरी नेत्यांनी राजकीय पक्षांपासून स्वत:ला दूर ठेवावे आणि आंदोलनातही राजकीय पक्षांचा शिरकाव होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी, असे गुरनामसिंग सांगतात, पण ते स्वत:च राजकीय नेत्यांच्या भेटी घेतात, अशी माहिती किसान मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकार्याने दिली.

रविवारी चादुनी यांनी जैन संसद आयोजित करण्याच्या मुद्यावर घेतलेल्या बैठकीत पंजाब आणि दिल्लीतील कॉंगे्रसचे काही आमदार व खासदार सहभागी झाले होते. याशिवाय, ते सर्वपक्षीय बैठकीतही उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाला कुठलीही माहिती न देता ते अशा बैठकांचे आयोजन कसे करू शकतात. त्यांची ही कृती शिस्तभंगाची असल्याचे पदाधिकार्याने स्पष्ट केले.

शिवकुमार कक्का संघाचे हस्तक?

या कारवाईनंतर चादुनी यांनी संयुक्त किसान मोर्चाचे नेते शिवकुमार कक्का यांच्यावर गंभीर आरोप केले. आंदोलनकर्त्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा केंद्र सरकारचा कट असून, यात कक्का प्रमुख भूमिका पार पाडत आहेत. ते संघाचे हस्तक आहेत, असे ते म्हणाले. माझ्यावरील आरोप निराधार असून, सरकारला मदत करण्यासाठीच माझ्याविरोधात हे आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला.

चर्चेची दहावी फेरी आज

शेतकरी नेते आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची दहावी फेरी उद्या मंगळवारी होणार आहे. सोबतच, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीची पहिली बैठकही उद्याच मंगळवारी होणार आहे.

मागील ५० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेले शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या नऊ फेर्या झाल्या, पण यातील कोणत्याही फेरीतून तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, आम्हाला शक्य तितक्या लवकर या समस्येवर तोडगा काढायचा आहे. थेट शेतकरी चर्चेत सहभागी असल्याने, तोडगा निघेल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केला.