भाजपच्या रॅलीवर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांची दगडफेक

January 19,2021

कोलकाता : १९ जानेवारी - ममता बॅनर्जी यांना झटका देत भाजपात प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या रॅलीवर  तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी दगडफेक केली. अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केल्यावर भाजपाने ममता बॅनर्जी यांचा गड समजल्या जाणार्या दक्षिण कोलकात्यात विशाल रॅली आयोजित केली होती. त्यानंतर राशबिहारी आणि चारू बाजार परिसरात तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.

टॉलिगंज ट्राम डेपो येथून भाजपाच्या रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली राशबिहारी ऍव्हेन्यू येथे संपणार होती. राशबिहारी ऍव्हेन्यूपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कालीघाट येथील निवासस्थान अत्यंत जवळ आहे. त्यामुळे हा परिसर त्यांचा गड समजला जातो. सुवेंदू अधिकारी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यावेळी तृणमूल कॉंग्रेसच्या महिला शाखेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि गुंडांनी दगडफेक सुरू केली. या रॅलीचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष करीत होते. ही रॅली चारू बाजाराच्या दिशेने जाताच काही गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांवर दगड आणि विटांचा मारा सुरू केला. या दगडफेकीत भाजपाचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या दगडफेकीनंतर संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी जवळच्या गल्ल्यांमधून पलायन केले, असे पोलिस अधिकार्याने सांगितले. यावेळी झालेल्या संघर्षात काही दुचाकी आणि दुकनांची तोडफोड करण्यात आली. भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर घटनास्थळावर पोलिसांचा ताफा दाखल झाला आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ममता सरकारमधील वरिष्ठ मंत्री अरूप बिस्वास यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.

ममतांचे आव्हान स्वीकारले

नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केल्यानंतर, भाजपाचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी, आव्हान स्वीकारताना, ममतांचा पराभव करण्याचा निर्धार जाहीर केला. असे न झाल्यास मी राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणाही त्यांनी केली. पक्षाने मला जर नंदीग्राममधून उमेदवारी दिली, तर ममता बॅनर्जींचा पराभव निश्चित आहे. ही निवडणूक मी किमान ५० हजार मतांनी जिंकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.