सरकारी डॉक्टर चुकीचा रिपोर्ट देतात - नितीन गडकरींचा दावा

January 19,2021

नागपूर : १९ जानेवारी - अनुभवाने सांगतो, तुम्हाला जर ड्रायव्हरचे डोळे तपासायचे असेल तर खासगी डॉक्टरकडूनच तपासून घ्या. सरकारी डॉक्टर चुकीचा रिपोर्ट देतात, असा मोलाचा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिला. गडकरी यांनी हा सल्ला देताच सभागृहात एकच खसखस पिकली. 

रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त विज्ञान भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह राजनाथ सिंहही उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत भाषण करत किस्से ऐकवले. महाराष्ट्रात विरोधी पक्षात असताना मी रेड लाईट कारमधून चाललो होतो. पूर्ण पोलीस बंदोबस्तात माझा ताफा निघाला होता. माझ्या ड्रायव्हरला मोतिबिंदू झाल्याचं मला नंतर कळालं. एका मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेली होती. तर एका केंद्रीय मंत्र्याच्या एका ड्रायव्हरचा एक डोळा खराब झालेला आढळून आलं, असं गडकरी म्हणाले.

त्यानंतर हलका पॉझ घेऊन गडकरी म्हणाले, मी अनुभवाने सर्व मंत्र्यांना आणि राजनाथ सिंह यांनाही सांगतो, तुम्ही सर्व तुमच्या ड्रायव्हरच्या डोळ्यांची तपासणी खासगी डॉक्टरकडून करून घ्या. एखाद्या ड्रायव्हरला डोळ्याचा त्रास जाणवल्यास तो सर्टिफिकेट घेऊन येतो. गडकरींचा सर्टिफिकेटचा हा रोख सरकारी डॉक्टरांच्या दिशेने होता.

50 टक्के अपघात कमी करणार

त्यानंतर गडकरी यांनी रस्ते अपघातातील मृत्यूंवर चिंता व्यक्त केली. 2025पर्यंत रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यावर भर दिला जात आहे. ही संख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी होईल, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आता रस्ते अपघातात देशात रोज 415 लोकांचा मृत्यू होतो. ज्या कारणांमुळे अपघात होतात, ती कारणे दूर केली नाही तर 2030 पर्यंत रस्ते अपघातात मरणाऱ्यांची संख्या 6-7 लाखांवर जाण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.