अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा - काँग्रेसची मागणी

January 19,2021

मुंबई : १९ जानेवारी - रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअँप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील चॅटिंग याचा पुरावा आहे की, भाजपाच्या कार्यकाळात झालेला बालाकोट एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचा आरोप करताना काँग्रेसने म्हटले आहे की हा ड्रामा उघड करण्यासाठी काँग्रेस लवकरच मोठी पत्रकार परिषद घेणार असून याप्रकरणी गंभीरपणे चौकशीची मागणी करणार आहे.

दरम्यान काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी लीक झालेले व्हॉट्सअँप चॅट ट्विट केले आणि म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेचा वापर हा निवडणुकांसाठी करण्यात आला होता का? माध्यमांमधील एक गट ज्या पद्धतीने रिपोटिर्ंग करत आहे ते जर खरे असेल तर बालाकोट एअर स्ट्राईक आणि २0१९ लोकसभा निवडणुकांच्या थेट संबंधांकडे इशारा करतात. त्यामुळे याची जेपीसीद्वारे चौकशी गरज असल्याचे म्हटले आहे. 

एक पत्रकार आणि त्याचे मित्र बालाकोटमधील दहशतवादी कँप उध्वस्त करणार्या स्ट्राईकबाबत प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वी तीन दिवस आधीच कल्पना होती? जर कल्पना होती तर याची काय गॅरंटी आहे की, त्यांच्या सुत्रांनी पाकिस्तानसाठी काम करणार्या खबर्यांकडून दुसर्या लोकांसोबत ही माहिती शेअर केली नसेल. सरकारचा एक गोपनीय निर्णय एका पत्रकारापयर्ंत कसा काय पोहोचला? असा सवाल उपस्थित करत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ट्विटर टॅग केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या चॅट प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. तसेच हे व्हॉट्सअँप चॅट गंभीर असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.