बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय इंडियन सफारीसाठी सज्ज

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - हिंदुस्तानातील सर्वात मोठ्या प्राणिसंग्रहालयापैकी एक असलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर येथील इंडियन सफारीचे उदघाटन येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार असून ते जनतेसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यापस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

वैविध्यपूर्ण असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी उदघाटनाच्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी  राज्याचे वनमंत्री संजय राठोड राहतील , प्रमुख अतिथी म्हणून रस्ते परिवण महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहमंती अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रेय भरणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी व  लोकप्रतिनिधी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उदघाटन करून इंडियन सफारीही करणार असल्याची माहिती  वासुदेवन यांनी दिली. या प्रकल्पाला २००५ मध्ये सुरुवात झाली आणि २००७ मध्ये एका खासगी एजन्सीला  काम दिले होते. परंतु ते निर्धारित वेळेत शक्य झाले नाही. २०११ मध्ये महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे प्रकल्पाची जबाबदारी दिल्यानंतर कामाला गती मिळाली. आता काम पूर्ण झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.  

या प्रकल्पाला ९५ कोटी रुपये मिळाले असून आतापर्यंत ६० कोटी रुपयांचा खर्च करून इंडियन सफारीचे काम पूर्ण आले आहे. उर्वरित केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाद्वारे मास्तर प्लॅन फेज २ मध्ये आफ्रिकन सफरीमध्ये झेब्रा, जिराफ, चित्ता सारख्या प्राण्यांचा समावेश राहणार आहे. नाईट सफारी, बायोपार्क, पक्ष्यांसाठी विशेष पार्क सुरु करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

इंडियन सफरीमध्ये ४ वेगवेगळ्या सफारीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिबट सफारी, व्याघ्र सफारी, अस्वल सफारी, व तृणभक्षी प्राण्यांची सफारी चा समावेश आहे. व्याघ्र सफरीमध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून २०१७ मध्ये स्थलांतरित करण्यात आलेला  राजकुमार नावाचा वाघ सोडण्यात आला आहे. तसेच महाराजबाग मधून ली नावाची वाघिणीलाही  स्तलांतरित करण्यात आले आहे. पर्यटकांना २ वाघांचे दर्शन होणार आहे. बिबट सफरीमध्ये ७ बिबटे असून ६ अस्वल बाबा आमटे ऍनिमल आर्क मेळघाट व इतर ठिकाणाहून प्राप्त झाले आहेत. तसेच तृणभक्षी सफरीमध्ये असणाऱ्या  १४ नीलगाय व ४ चितळ यांचा समावेश आहे. 

इंडियन सफारी सुरु करण्यात येणार असून या ठिकाणी प्रत्येकी २५ हेक्टर परिसरात मोठे वारुळे, गुहा नैसर्गिक पाणवठे तलाव  व नैसर्गिक चार अधिवास तयार करण्यात आले आहेत. 

पत्रपरिषदेला वनबल प्रमुख रामबाबू , प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, मीरा अय्यर  माहिती अधिकारी स्नेहल पाटील उपस्थित  होते.