लेखणी ही तालवारींपेक्षाही परिणामकारक - शांताक्का

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - लेखणी हे शस्त्र खड्ग म्हणजेच तलवारींपेक्षाही परिणामकारक असते कारण, तलवार एकावेळी एकावर वार  करते तर लेखणी एकावेळी अनेकांपर्यंत पोहचत असते. त्यामुळे लेखणीची ताकद दुर्लक्षिता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रसेवीका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आज केले. ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक अविनाश पाठक यांच्या हितगुज या भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज शांताक्का यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र हे विशेष अतिथी म्हणून  उपस्थित होते. राष्ट्रसेवीका समितीच्या पूर्व प्रमुख संचालिका  प्रमिलाताई मेढे याही यावेळी व्यासपीठावर उपस्थित  होत्या. 

यावेळी बोलताना शांताक्का म्हणाल्या की, देशाचा इतिहास लक्षात घेतल्यास पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या ताकदीवर इंग्रज सरकारलाही  वाकायला भाग पाडले होते, १९०५ मध्ये भगिनी निवेदिता यांनी वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या एका लेखाने  जनजागरण झाले. आणि त्या जोरावर तत्कालीन ब्रिटिश सत्ताधीश लॉर्ड कर्झनलाही वाकावे लागले. याची आठवण त्यांनी दिली.  

यावेळी आपल्या भाषणात शांताक्कानी हितगुज या पुस्तकातील विविध लेखांचा परामर्श घेतला, पत्रकार समाजाच्या विभिन्न क्षेत्रात वावरतात आणि ज्ञान मिळवतात हे ज्ञान चिरंतन असते असेच अनुभवरुपी ज्ञान अविनाश पाठक  यांनी आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहोचवले आहे असे सांगताना हे अविनाशी म्हणजेच चिरंतन ज्ञान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पत्रकारितेत माहिती घेणे, त्याद्वारे वाचकांना शिक्षित करणे आणि त्यांचे मनोरंजन करणे हे प्रमुख टप्पे असतात मात्र आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात हे तीन टप्पे आता उलट्या दिशेने चालले आहेत, आज पत्रकार मनोरंजन करताना माहिती आणि शिक्षण  हे पार विसरून गेले आहेत अशी खंत  महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी यावेळी  बोलताना व्यक्त केली. 

आपल्या देशात गेली अनेक वर्षे इतिहासाचे विकृतीकरणचं केले गेले आहे. आजही काही लोक त्यातच व्यस्त आहेत, त्यामुळे समाजात दुही वाढते आहे.  हा प्रकार थांबवण्यासाठी पत्रकारांनी पुढे यायला हवे अशी अपेक्षा मैत्र यांनी व्यक्त केली. गेली चार दशके पत्रकारिता करणाऱ्या अविनाश पाठक यांनी आपल्या अनुभवावर १४ पुस्तके लिहिणे ही मोठी उपलब्धी असल्याचे नमूद करून, अशा पत्रकारितेची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रारंभी हितगुजचे लेखक अविनाश पाठक यांनी सर्वांचे स्वागत करीत आपल्या लेखन प्रवासाबाबत माहिती दिली, त्यानंतर प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.  याचवेळी शांताक्कानसह मान्यवरांनी पुस्तकाचे  विधिवत प्रकाशन केले. 

देवी अहिल्यामंदिर परिसरात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, सोपान  पांढरीपांडे, प्राचार्य डॉ.  तनुजा  नाफडे, श्याम देशमुख, अभिनंदन पळसापुरे, हेमंत सावरकर, अनुरूप पाठक प्रभृतींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

अविनाश पाठक यांचे हितगुज हे १४वे पुस्तक असून ते ई-बुक म्हणूनच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक अमेझॉन किंडल आणि  पुस्तक भरारी या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.