रपट्याच्या बाजूला सापडला ६ महिन्याच्या बालिकेचा मृतदेह

January 24,2021

अमरावती : २४ जानेवारी - धारणीपासून ७ कि. मी. अंतरावरील धारणी-बैरागड मार्गावर दिया गावाजवळ एका रपट्याच्या बाजुला झुडपात पडलेला सहा महिन्याच्या बालिकेचा मृतदेह दिसून आल्याने एकच खळबळ माजलेली आहे. पोलिस अधिकारी चव्हाण यांनी घटनास्थळावर पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिस तथा आरोग्य विभाग आरोपी अथवा पालकांचा शोध घेत आहेत. 

सहा ते सात महिने वयोगटातील मुलगी असल्याची माहिती असून आरोग्य विभागाने दिया धारणमहू तथा उकुपाटी गावात गेल्या सहा-सात महिन्यातील प्रसुती झालेल्याचा शोध झपाट्याने सुरू केलेला आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवार, 23 जानेवारीच्या दुपारी पोलिस निरीक्षक विलास कुळकर्णी यांना दूरध्वनीवर माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळावर पाठविण्यात आले. भल्या पहाटे अज्ञात आरोपींनी रायमुनियाच्या झाडी झुडपात लाल कपड्यात बांधून मृतदेह फेकल्याचा अंदाज आहे. 

या प्रकरणी गावातील आशा वर्कर, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका आणि एन. एम. यांनी तपास करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक कुळकर्णी यांनी केले आहे. मृत मुलीला काही रोग अथवा अपंगत्व असल्याने पालकांनी सदर जघन्य अपराध केल्याचा अनुमान आहे. जवळच्या गावांना वगळता दुरच्या गावातील आरोपी सुद्धा असू शकतात. पोलिसांनी गुन्हा कायम करुन तपास सुरू केलेला आहे.