आमदाराने पकडली अवैध दारू मात्र गृहमंत्री प्रकरण झाकण्याचा तयारीत?

January 24,2021

चंद्रपूर : २४ जानेवारी - आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारू पकडून दिली. जी कारवाई पोलिसांनी करायला हवी होती, ती आमदारांनी केली. यावर सध्या चर्चा रंगत आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता, असे पुन्हा घडायला नको, असे निर्देश पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. दरम्यान, अवैध दारू सुरूच राहिली. सत्तांतरणानंतर तर ती अधिक राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच स्थानिक अपक्ष, मात्र सत्तेशी जुळवून घेणारे आ. किशोर जोरगेवार यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर महामार्गावर पडोली पोलिस ठाणे हद्दीत अवैध दारूच्या वाहतुकीची सात वाहने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. यावर आता पोलिसांवर आरोप केले जात आहेत. 

राज्याचे गृहमंत्री जिल्ह्याचे दौऱ्यावर  आले होते. रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन सभागृहात उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी सात अवैध दारूच्या गाड्या पकडल्याचे लक्षात आणून दिले गेले. ही कारवाई करताना पोलिस अधिकार्यांनी आमदारांशी उर्मट संवाद केल्याचेही सांगितले गेले. त्यावर त्यांनी असे घडायला नको. जोरगेवार आपल्याला भेटून गेले. त्यांची तक्रार ऐकली आहे, असे देशमुख म्हणाले. आणखी काही प्रकरण असेल, तर ‘स्पेसिफिक’ द्या असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

महाविकास आघाडी सरकारला ज्यांनी समर्थन दिले, ते अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी परवा अवैध दारूचे ट्रक पकडून दिले. त्याच दिवशी सत्तेत सहभागी राकाँचे चंद्रपूर शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी सुगंधी तंबाखू पकडून दिली. अर्थात, चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसायाला आघाडी सरकारमध्ये अधिक ऊत येत असल्याचे अप्रत्यक्षपणे सिध्द होेत आहे आणि तेही त्यातील लोकांच्याच माध्यमातून हे होत असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे!