प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

January 24,2021

यवतमाळ : २४ जानेवारी - खुटाळा गावशिवारातील शेतात रखवालदाराच्या झालेल्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत उलगडा केला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीचा काटा काढल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. पोलिसांनी महिलेसह तिचा प्रियकर व अन्य एकाला आज अटक केली आहे.

नामदेव गोंदूजी पेंदाम (५0) असे खून करण्यात आलेल्या रखवालदाराचे नाव आहे. खुटाळा गावशिवरातील पांडुरंग वाघमारेची शेती वार्हा येथील गजानन चिव्हाणे यानी मक्त्याने केली होती. त्यांच्या शेतावर रखवालदार म्हणून मृतक नामदेव होता. १२ जानेवारीला सकाळी १0 वाजता त्याचा मृतदेह शेतात आढळल्याने चिव्हाणेनी त्याचा मुलगा योगेशला माहिती दिली होती. योगेशने सदर घटनेची माहिती कळंब पोलिसांनी देताच ठाणेदार अजित राठोड व त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता. नामदेवच्या डोक्यासह कानावर जखमा दिसल्याने त्याचा खुनच झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्याचा खून कोणी व का केला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. तब्बल दहा दिवसापासून ठाणेदार राठोड यांनी आपली तपासचक्रे फिरवून गुन्ह्याचा सोक्षमोक्ष लावला. मृतक नामदेवची पत्नी मंदा पेंदाम (४४) रा. वार्हा ता. राळेगांव हिचे गावातील मारोती हरबा अराळे (४२) याचेसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच या दोघांनी निकेश गुलाब करलुके (२७) रा. दोनोडा याच्या मदतीने नामदेवचा खून केल्याचे पुढे आले. पोलिसांनी आज तिघांनाही अटक करून खुनाचा गुन्हा नोंदविला. ठाणेदा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राजू कुळमेथे, ओम धरणे, सचिन ठाकरे, गजानन धात्रक यांनी खुनातील आरोपींचा शोध लावला.