दुचाकीतील पेट्रोल संपल्याने चोरटा पोलिसांना सापडला

January 24,2021

भंडारा : २४ जानेवारी - विद्यार्थ्याच्या चोरलेल्या दुचाकीमधील पेट्रोल ऐनवेळी संपल्याने चोरटा जाळ्यात अडकल्याची घटना कारधालगत भिलेवाडा फाटा येथे उघडकीस आली आहे. चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून तो मध्य प्रदेशातील असल्याचे पुढे आले.

भिलेवाडा येथील साहिल राजू पुडके (वय १७) हा कारधा येथील शंकरराव काळे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो गुरुवारी महाविद्यालयात गेला. आपली दुचाकी त्याने पार्किंगमध्ये उभी केली. क्लास आटोपून परत आला तेव्हा दुचाकी दिसली नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी पोलिस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी जात होता. त्यावेळी अचानक एक इसम पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत रस्त्याने जात असल्याचे दिसून आले. साहिलने ही आपली दुचाकी असल्याचे ओळखले. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला असता तो पळून जायला लागला.

परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला पकडून कारधा पोलिसांच्या हवाली केले. महेंद्र चुन्नीलाल बोंबचरे (वय ३५) रा. बोनकट्टा जि. बालाघाट, मध्यप्रदेश असे आरोपीचे नाव आहे