उधार घेतलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राचा केला खून

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - मित्राला ५0 हजार रुपये उसणे देणे एका युवकाच्या जीवावर बेतले. उधार घेतलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना  रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास कोतवाली हद्दीत घडली. आनंद नरेंद्र आडे (२८)असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, बॅॅनर तयार करण्याचे काम करणार्या आनंद आडे याने त्याचा मित्र नवीन सोनी रा. जुनी शुक्रवारी याला ५0 हजार रु. उसने दिले होते. नवीन हा मिळेल ते काम करायचा. नवीनने एक महिन्यात पैसे परत करणार असल्याचे सांगून त्याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, बरेच महिने उलटले तरी त्याने पैसे परत केले नाही. त्यामुळे आनंद नवीनला पैशांसाठी तगादा लावू लागला होता. सारखेसारखे पैसे परत करण्याची मागणी आनंद करीत असल्यामुळे नवीनने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. त्याने त्याच्या काही मित्रांना जुळवून आनंदचा गेम करण्याच्या उद्देशाने त्याला पैसे घ्यायला ये, असे सांगून बोलावून घेतले. २२ जानेवारीला रात्री ९ साडेनऊच्या सुमारास आनंद हा त्याचा मित्र यश रमेश सावरकर (१९) रा. गाडीखाना याला सोबत घेऊन नवीनकडून पैसे परत आणण्यासाठी त्याच्या एमएच ४९ / बीएच ८९८७ क्रमांकाच्या अँक्टिव्हाने जुनी शुक्रवारी येथील हनुमान गल्लीतील रोडने जात होते. त्याचवेळी नवीनने आनंदला आवाज दिला. आनंद गाडीवरून उतरून कोतवाली हद्दीतील जुनी शुक्रवारीतील देवांजली अपार्टमेंट मागे गल्लीतील रोडवर आला. तेथे नवीनने आधीच सपाळा रचून ठेवला होता. नवीनने आनंदचा गेम करण्यासाठी सोबत आणलेले पंकज शेंद्रे रा. मांगपुरा, राहुल काळे रा. मांगपुरा, प्रवीण नेरकर रा. राहतेकरवाडी, दसरा रोड हे आणि नवीन तेथे दबा धरून बसले होते. आनंद तेथे येताच यांनी संगनमत करून त्याच्यावर चाकू, कुर्हाडीने व ट्यूबलाईटने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात गळ्यावर आणि छातीवर गंभीर वार झाल्याने आनंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यश सावरकर त्याची वाट पाहत दूर उभा होता. त्याला याबद्दल जराही कल्पना नव्हती. खूप वेळ झाला तरी आनंद परतला नाही म्हणून तो त्याला बोलवायसाठी तेथे गेला, तेव्हा त्याला आनंद मृतवस्थेत मिळून आला. याप्रकरणी यशने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मुख्य आरोपी नवीन सोनी हा पसार होण्यात यशस्वी झाला तर इतर तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.