उत्तर नागपुरात आता तीन उड्डाणपूल होणार - नितीन गडकरी

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - शहराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यासाठीही आम्ही मागे राहिलो नाही. उत्तर नागपुरात आता तीन उड्डाणपूल निर्माण होणार आहेत. आणखी कामे प्रस्तावित आहेत. आतापर्यंत ९0 हजार कोटी विकास कामांसाठी नागपुरात आणले. ही सर्व कामे जनतेमुळे झाली आहेत. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे प्रतिपादन रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमईमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन समारंभ ना. गडकरी यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आ. सुधाकर देशमुख, माजी आ. डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, अशोक मेंढे आदी उपस्थित होते. उड्डाणपुलासाठी ८0 कोटी खर्च करण्यात येणार आहे व ७४0 मीटर लांब या पुलाची लांबी आहे. गडकरी म्हणाले, इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक ते शितलामाता मंदिर असा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. या कामाची किंमत ४४0 कोटी आहे. पुढे डागा हॉस्पिटलजवळ उड्डाणपुलावर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्पची तरतूद करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल अशोक चौकातून पुढे उमरेड रोडपर्यंत प्रस्तावित आहे. शहरालगत केंद्रीय मार्ग निधीतून ५0 कोटींचा काँक्रीटचा रिंग रोड बांधला. त्यापुढे १२00 कोटींचा रिंग रोड पुन्हा घेण्यात आला आहे. ईटारसी पुलामुळे आता १0 मिनिटात महालचे अंतर कापता येणार आहे. तसेच उत्तर नागपुरात सर्वात मोठा मॉल बनविण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या मेट्रोच्या असलेल्या र्मयादा वाढवून कन्हान, बुटीबोरी, हिंगणा गावापयर्ंत मेट्रो नेण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रोबाबत १५ दिवसात निर्णय होईल. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. मिहानमध्ये कंपन्यांमध्ये ५६ हजार तरुणांना आतापर्यंतत रोजगार उपलब्ध झाला. येत्या २ वर्षात १ लाख तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचेही गडकरी म्हणाले.