शशिकांत शिंदे राजकीय जोक मारत आहेत - सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

January 24,2021

चंद्रपूर : २४ जानेवारी - देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात केला. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून शिंदे यांनाच खोचक टोला लगावला.

 “शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचं मला खूपच आश्चर्य वाटतंय. निवडणूक लढवताना २८ लाख रुपयांच्या वर पैसे प्रचारासाठी किंवा तत्सम बाबींसाठी खर्च करू नयेत हा नियम आहे. असे नियम असतानाही १०० कोटींची ऑफर होती असं सांगणं म्हणजे एक तर शशिकांत शिंदे यांना या गोष्टीचं अजिबात ज्ञान नाही. किंवा दुसरी शक्यता म्हणजे शशिकांत शिंदे करोनानंतरचा या वर्षांतील सर्वात मोठा राजकीय जोक मारत आहेत असा त्याचा अर्थ लावता येईल”, अशा शब्दात टीव्हीनाइनशी बोलताना मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं.

शशिकांत शिंदे यांनी शनिवारी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं”, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. “त्यावेळी मी ऑफर नाकारली होती आणि भविष्यातही मी ऑफर नाकारतच राहीन. उदयनराजे हे भाजपात जात असतानाही मला ऑफर आली होती पण मी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे”, असं शशिकांत शिंदे म्हणाले होते.