सर्वात मोठ्या ‘एअरो इंडिया शो’चे आयोजन 3 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान

January 24,2021

बंगळुरू : २४ जानेवारी - संरक्षण दलाच्या सर्वांत मोठ्या ‘एअरो इंडिया शो’चे आयोजन 3 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे. संरक्षण दलाचे हे सर्वांत मोठे प्रदर्शन असून, ते दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येते. कोरोना काळातील अनेक अडचणींवर मात करून याचे यशस्वी आयोजन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

संरक्षण दलाचा एअरो शो हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये देश-विदेशातील मोठ्या कंपन्या भाग घेतात. यावर्षी आयोजित करण्यात आलेला एअरो शो हा हायब्रिड स्वरूपाचा असेल. त्यामध्ये आभासी तसेच प्रत्यक्ष या दोन्ही पद्धतीने भाग घेता येणार आहे.

या एअर शोमध्ये 42 भारतीय विमाने भाग घेणार आहेत. ज्यामध्ये एमआय-17, व्ही 5, एएलएच, एलसीएच, एलयूएच, सी-17, एम्ब्रर, एएन-32, जग्वार, हॉक, सुखोई-30, एलसीए, राफेल आणि डॉर्नियर या लढाऊ विमानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वर्षी सूर्यकिरण आणि सारंग एरोबेटिक डिस्प्ले सोबत होणार आहेत तसेच परशुराम विमान या शोमध्ये भाग घेणार आहे. तसेच काही विदेशी विमानांचा देखील यामध्ये समावेश आहे.

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विदेशी विमानांच्या समावेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये दिवसातून दोनवेळा प्रदर्शन होतील. कोरोनाचा काळ लक्षात घेता नेहमी पाच दिवसांचे असणारे हे प्रदर्शन या वर्षी तीन दिवस असेल, असे सांगण्यात आले.