आज भारताला कुणीही झुकवू शकत नाही - नरेंद्र मोदी

January 24,2021

कोलकाता : २४ जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या भारताची अपेक्षा केली होती, हाच तो भारत आहे. आजचा भारत इतका मजबूत आहे की, नियंत्रण रेषेपासून तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले आहे. या भारताला कुणीही झुकवू शकत नाही, कुणी दबाव आणू शकत नाही, याची प्रचिती जगाला आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केले.

भारताने कोरोना महामारीचा यशस्वीपणे सामना केलाच, शिवाय देशाचे सार्वभौमत्व जोपासताना सीमेवरही शत्रूंचा प्रभावी सामना केला. अशाच शक्तिशाली भारताचे नेताजींचे स्वप्न होते. आजचा भारत पाहून त्यांना नक्कीच अभिमान झाला असता, असे मोदी यांनी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये नेताजींच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. मी कधीकधी विचार करतो की, नवा आणि मजबूत भारत आकारास येत असल्याचे पाहून नेताजींना काय वाटले असते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या भारताची निर्मिती करण्यात आली आहे. जेव्हाजेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाला कुणी आव्हान दिले, तेव्हा सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. तेजस आणि राफेल यासारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी आपली सशस्त्र दले सज्ज आहेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाहून उपस्थितांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यामुळे ममता नाराज झाल्या. हा शासकीय कार्यक्रम आहे, राजकीय नाही. मला या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. अशा प्रकारे बोलावून अपमान करणे योग्य नाही, अशा शब्दात बॅनर्जी यांनी राग व्यक्त केला. शासकीय कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचा सन्मान राखायलाच हवा. हा व्यवहार अशोभनीय आहे. मला येथे भाषण करायचे नव्हते आणि आता तर मला काहीच बोलायचे नाही. जय बांगला… जय हिंद… असे म्हणत त्या आसनावर विराजमान झाल्या.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आसाममधील सुमारे एक लाख कुटुंबीयांना जमिनींचे मालकी हक्क प्रदान केले. तसे प्रमाणपत्र मोदी यांनी त्यांना दिले. पंतप्रधान मोदी आज आसामच्या शिवसागर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. यावर्षीचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. जमिनीचे मालकी हक्क तसेच येथील जनतेची सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी राज्यातील भाजपा सरकार आणि केंद्र सरकार दोघेही वचनबद्ध असल्याचे मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आजवरच्या सरकारांनी अनेक वर्षांपर्यत नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कापासून दूर ठेवले होते. राज्यात भाजपाचे सरकार येण्यापूर्वी सहा लाखांवर नागरिकांकडे त्यांच्याच जमिनीची मालकी सांगण्यासाठी कुठलेही कायदेशीर दस्तावेज नव्हते. मागील दोन वर्षांच्या काळात भाजपा सरकारने दोन लाखांवर नागरिकांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले आहे, असे मोदी म्हणाले.