नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवून आणली - साक्षी महाराजांचा भरसभेत आरोप

January 24,2021

लखनौ : २४ जानेवारी - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून, खळबळ उडवून दिली आहे. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवून आणली” असा आरोप त्यांनी भर सभेत केला आहे. विशेष म्हणजे हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त उन्नाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले आहे. यामुळे आता राजकीय वातारण तापयला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

साक्षी महाराज म्हणाले, “अवेळीच सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं होतं. माझा आरोप आहे की काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली आहे. हे फक्त त्यांच्या लोकप्रियतेमुळे करण्यात आलं होतं. कारण, सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेसमोर पंडित नेहरू व महात्मा गांधी यांचा कुठच टिकाव लागत नव्हता.”

तसेच, “सुभाषचंद्र बोस ते व्यक्तिमत्व होतं ज्यांनी नारा दिला होता की, “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा..” इंग्रज एवढे सरळ नव्हते की मागितल्यावर स्वातंत्र्य दिलं असतं. या स्वातंत्र्यासाठी अनेक जण शहीद झाले आहेत. रक्त सांडवून आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे.” असं देखील साक्षी महाराज यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सुभाषचंद्र बोस यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अद्यापही गुढ का कायम आहे? पंडीत नेहरु यांनी चौकशी का केली नाही? त्यांच्या मृत्यूबाबतचे सत्य बाहेर यायला हवं.” असं देखील साक्षी महाराज म्हणाले आहेत.