आज नागपुरात चिकन आणि अंडी महोत्सव झाला साजरा

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - मागील बऱ्याच दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूच्या संसर्गानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात हा संसर्ग पाहिला गेला नाही. पण, कालांतरानं राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाच्या घटना पाहायला मिळाल्या. ज्यामुळं हजारो पक्षी मारण्यातही आले. एकिकडे पक्ष्यांमध्ये अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या या संसर्गाची दहशत असतानाच दुसकरीकडे चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनीही आता या गोष्टींकडे भीतीपोटी पाठ फिरवली आहे.

बर्ड फ्लूच्या भीतीमुळं चिकन आणि अंडी खाण्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. काहींनी तर या गोष्टी खाणं दूर त्यांच्याकडे पाहणंही सध्या बंदच केलं आहे. पण, लोकांमधील हाच संभ्रम दूर करण्यासाठी नागपुरात एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. महाराष्ट्र पशुविज्ञान, मत्स्यपालन विद्यापीठात चक्क चिकन आणि अंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थित हा महोत्सव पार पडला. यावेळी बर्ड फ्लूबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असा इशाराही केदार यांनी दिला.

माणसाला बर्ड फ्लू झालेला दाखवल्यास रोख पारितोषिक देण्याच्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, अंडी आणि चिकन महोत्सवात त्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांवर खवय्यांनी चांगलाच ताव मारला. पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही यानिमित्तानं रविवारचा पुरेपूर आस्वाद घेतला. खुद्द पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्वतः मात्र चिकन खाल्ले नाही. ते स्वतः शाकाहारी असल्यामुळे चिकन खात नसल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.