वनविभागाच्या अडथळ्यामुळे दुर्गम भागात वीज पोहोचवण्यास येतात अडथळे - बच्चू कडू

January 24,2021

अमरावती : २४ जानेवरी - मेळघाटात आजही 24 गावं अंधारात आहेत. माखला गावात भरपूर लोकसंख्या असताना या गावतही वीज पोचली नाही. या भागात वीज पोचविणे आमचे कर्तव्य आहे आणि यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करणार. खरं तर वन विभागाच्या अडथळ्यामुळे दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडसर निर्मण होतो आहे. वन विभाग केंद्र शासनाच्या अधिकाराचा भाग असून अंधारात बुडालेल्या गावांचा अंधार दूर करण्यासाठी केंद्र सरकारसोबत लढा देणार, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

चंदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी स्थित संत गाडगेबाबा मिशनच्या निवासी आश्रम शाळेच्यावतीने माखला या मेळघाटातील दुर्गम भागात आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाची जनजागृती व्हावी, आदिवासीं भागातील रहिवाशांनी मुलांना आश्रम शाळेत शिक्षणासाठी पाठवावे यासाठी जनजागृती सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमानिमित्त बच्चू कडू गावात आले असता त्यांचे ग्रामस्थ आणि संत गाडगेबाबा मिशनच्या आश्रम शाळेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या आमदार राजकुमार पटेल हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

मेळघाटातील प्रयत्न स्थळ म्हणून विकसित झालेल्या चिखलदरा ज्या उंचीवर वसले आहे, तितक्याच उंचीवर माखला गाव वसले आहे. चिखलदराचा विकास झाला मात्र माखला गाव विकासा पासून वंचित आहे. येत्या काळात माखला गावाचा विकास चिखलदरा प्रमाणे करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे बच्चू कडू म्हणाले.

माखला आणि लगतच्या परिसरातील आदिवासी गावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे महसूल विभागाशी संबंधित कामे त्वरित निकाली लागावेत यासाठी पुढच्या वर्षी 23 जानेवारीला माखला गावात शासकीय मेळावा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली. यानिमित्ताने गावात शासकीय अधिकारी येतील. सातबारा, आधारकार्ड, रेशन कार्ड आशा सर्व आवश्यक गरजांची पूर्ती या शासकीय जत्रेद्वारे होईल असे बच्चू कडू म्हणाले.

नाहेवाडी येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेचे प्रमुख बापूसाहेब देशमुख यांनी कीर्तनाच्या माध्यमातून यावेळी शिक्षणाचे महत्व आदिवासी बांधवांना सांगितले. मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.