अंड्यामुळे पती-पत्नीत झालेले भांडण पोहोचले पोलिसात

January 24,2021

बुलडाणा : २४ जानेवारी -  नवरा बायकोची भांडणं नवीन नाहीत. कारणं वेगवेगळी असतील पण नवरा-बायकोची भांडणं प्रत्येक घरात होत असतात. बुलडाण्यातील एका जोडण्याचं असंच भांडण झालं आणि भांडणाला निमित्त ठरलं अंड. अंड्यांमुळे झालेलं हे भांडण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आणि अंड्यामुळे मिटलं.

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा प्रकार आहे. हे भांडण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं तेव्हा या विचित्र भांडणामुळे पोलीसही चक्रावून गेले. पती-पत्नीमध्ये दोन अंड्यांवरुन भांडण झालं. पतीने संध्याकाळी जेवणासाठी दोन अंडे आणले होते. दोन अंड्यांची मला भाजी करून दे असं पतीने पत्नीने सांगितलं. पत्नीने भाजी केली मात्र ती मुलीला खाऊ घातली. मग काय नवऱ्याला राग अनावर झाला आणि थेट भांडणाला सुरुवात झाली. वाद वाढत गेला आणि पती-पत्नी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. या कॉमेडी भांडणामुळे गावकरीदेखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

दरम्यान ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी या वादाचे मुळ शोधले. हे भांडण फक्त दोन अंड्यांवरून झालंय हे त्यांना कळालं. त्यामुळे ठाणेदारांना देखील प्रश्न पडला. त्यामुळे एकतर गुन्हा दाखल करावा की भांडण सोडवावे या पेचात ते पडले. मात्र पती-पत्नी दोघांनाही शांत करत पोलिसांनीच दोन अंडे विकत आणले आणि त्यांच्या हवाली केले आणि तिथेच भांडण मिटलं. हे भांडण मिटलं असलं तरी या निराळ्या भांडणाची आणि पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी केलेल्या धडपडीची चर्चा सर्वत्र रंगत आहे.