प्रत्येक भारतीयाचा विजय हाच जयहिंद चा अर्थ - उपराष्ट्रपती

January 24,2021

नवी दिल्ली : २४ जानेवारी - राष्ट्रवादाचा अर्थ केवळ 'जय हिंद' किंवा 'जन गण मन' म्हणणं असा होत नाही असं महत्वपूर्ण वक्तव्य उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलंय. जय हिंदचा अर्थ प्रत्येक भारतीयाचा विजय असा आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या गरजांकडे लक्ष दिलं जाईल. तेंलगना सरकारने आयोजित केलेल्या हैदराबाद मधील एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, "राष्ट्राचा अर्थ केवळ भौगोलिक सीमा नाहीत, राष्ट्रामध्ये सर्व गोष्टींचा समावेश होतोय. आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की संपूर्ण जग हे एक परिवार आहे. प्रत्येक भारतीयाला पोटाला अन्न मिळेल, त्यांना कपडे मिळतील, त्यांना कोणत्याही भेदभावाला सामोरं जावं लागणार नाही हे पाहणं म्हणजे राष्ट्रवाद आहे."

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, "युवकांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि गरीबी, अशिक्षितपणा, सामाजिक आणि लैंगिक भेदभाव तसेच भ्रष्टाचार अशा वाईट गोष्टी काढून समाजातून टाकाव्यात. भारताची 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षाखालील आहे. या युवकांनी पुढे यावं आणि नव्या भारताचं नेतृत्व करावं."

स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेवर बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, "स्वातत्र्य लढ्यात प्रत्येक नेत्याची भूमिका वेगळी होती, स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग वेगळा होता. पण सर्वांचे लक्ष मात्र भारताला गुलामीच्या बेडीतून मुक्त करण्याचं होतं. नेताजींच्या सोबत ब्रिटिशांशी लढताना सर्व जाती, धर्माचे सैनिक एकाच थाळीत जेवण करायचे, एकत्र रहायचे. भारतातून जाती व्यवस्थेचे उच्चाटन करण्याची नेताजींची इच्छा होती."