बायको दुसऱ्यासोबत पळून गेली तर तू दुसरी शोध - न्यायाधीशांचा तक्रारकर्त्याला अजब सल्ला

January 24,2021

पाटणा : २४ जानेवारी - कधी-कधी कोर्टाने दिलेले निर्णयदेखील मजेशीर असतात. पाटना कोर्टातून अशीच एक बातमी समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपलं दु:ख घेऊन कोर्टात आला होता. आपली पत्नी कोणासोबत तरी पळून गेली, यासाठी पतीने कोर्टात धाव घेतली होती. तक्रारदार पतीबरोबरच आरोपीदेखील न्यायाधीशांसमोर उभा होता. मात्र त्याला शिक्षा देण्याऐवजी कोर्टाने जामीन मंजुर केला आणि पीडित पतीला जे म्हटलं ते सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

न्यायाधीश म्हणाले की, जर तुमची पत्नी कोणा दुसऱ्यासोबत पळून गेली असेल तर तिला विसरून जा. दुसरी मुलगी शोधा. जी पळून गेली ती आता तुमची कुठे राहिली? मिळालेल्या माहितीनुसार पीडित व्यक्तीचं नाव नागेंद्र कुमार जैस्वाल (25 वर्षे) असून त्याचं लग्न 30 नोव्हेंबर 2017 मध्ये तान्या उर्फ मधुसोबत झालं होतं. सुरुवातीला मधू आपल्या सासरी राहत होती, मात्र त्यानंतर तिने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा पतीसमोर व्यक्त केली.

पतीने दरभंगातील एका कॉलेजमध्ये पत्नीला प्रवेश घेऊन दिला आणि हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यात लॉकडाऊन लागू झाल्याने तान्या आपल्या माहेरी निघून गेली आणि काकासोबत राहू लागली. त्यात एकेदिवशी ती काकाच्या घरातून गायब झाली. तिचा फोन बंद येत होता. बराच शोध घेतल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. ती हॉस्टेलमध्ये राहत असताना एका व्यक्तीसोबत बराच काळ बोलत असे. त्या व्यक्तीचं नाव राजेश कुमार आहे. ती त्याच्यासोबत पळून गेली होती. पतीच्या एफआयआरनंतर पोलिसांनी राजेश कुमारला अटक केली आणि कोर्टात हजर केलं. येथे न्यायाधीशांनी त्याला जामीन मंजूर केला. तर पीडित पतीला न्यायाधीश पी के झा यांनी दिलेल्या सल्ल्याची चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचं ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठ वकिलांनी  काही चर्चा केली, आरोपी राजेश याला जामीन देण्यात आला आहे.