भाजपनंतर आता मनसे नेतेही भाजप नेत्यांना भेटायला पोहोचले

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - भाजप नेते प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून केवळ विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी राजू पाटील यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यांनी गडकरींना याबाबबतचे पत्र सुद्धा दिले आहे .

डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न 2009 पासून प्रलंबित आहे. तत्कालीन दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने 93 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला. या प्रस्तावाला अद्यापही गती मिळालेली नाही.

सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळत आहे. दिवा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. या परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे भविष्यात कल्याण शिळ रस्त्यावरुन पायी चालायला जागा उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता अत्यंत आवश्यक आहे. कारण या परिसरातही मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे.

तसेच आजही डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांना रेल्वे वाहतुकीशिवाय कोणताही पर्याय नाही. अतिवृष्टी किंवा तांत्रिक कारणामुळे रेल्वेसेवा बंद पडल्यास येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. याआधी अनेक वेळा असे प्रकार घडलेले असून चार-चार दिवस लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे हा रस्ता होणे महत्त्वाचे आहे, अशी मागणी डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा येथील प्रवाशांची आहे.

“सर्व तांत्रिक अडचणीवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून, खाजगी जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. तरी  डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल”, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.