अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे घर झाले बेचिराख

January 28,2021

अमरावती : २८ जानेवारी - वरूड तालुक्यातील शिंगोरी येथेही तीन घराला  रात्री 10 वाजता अचानक आग लागली. यामध्ये शेतकऱ्याच्या  घरातील 140 क्विंटल कापूस आणि धान्य, कपडे तसेच संपूर्ण घर बेचिराख झाले. आगीची माहिती मिळताच वरुड, शेंदूरजना घाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र. तो पर्यंत सर्व काही बेचिराख झाले होते. घटनास्थळावर बेनोडा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. 

अंदाजे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील शिंगोरी येथील ज्ञानेश्वर अलोणे, पाडूरंग अलोणे, प्रल्हाद अलोणे यांच्या घराला 26 जानेवारीला रात्री 10 वाजताच दरम्यान आग लागली. तिन्ही आगग्रस्त हे शेतकरी असल्याने घरात कापूस ठेवला होता. वेळीच भाव मिळत नसल्याने भाववाढीचे दृष्टीने त्यांनी तो साठवून ठेवला होता. आगीत 140 क्विंटल कापूस जाळून खाक झाला. घरातील अन्नधान्य, कपडे व कृषी साहित्यासह संपूर्ण घर बेचिराख झाल्याने अलोणे परिवार उघड्यावर आला आहे. यावेळी बेनोडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकते यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळावर आले होते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.