ट्रकने चिरडल्याने महिला जागीच ठार, संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या

January 28,2021

अमरावती : २८ जानेवारी - दर्यापूर येथील अतिशय वर्दळ असलेल्या पेट्रोल पंप चौकात रस्ता ओलांडताना दुचाकीवरून घसरून खाली पडलेल्या महिलेला पाठीमागून येणार्या ट्रकने चिरडल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी घडली. जमावाने ट्रकच्या काचाही फोडल्या. 

रोहिणी स्वप्नील काकड ( वय 27, रा. कोकर्डा ता. अंजनगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान त्या आपल्या पतीसोबत दुचाकीवर बसून सेतू केंद्रातील कामासाठी जात होत्या. पेट्रोल पंपाच्या जवळ रस्त्याचे काम सुरू असून अनेक दिवसापासून रस्त्याच्या दोन्ही कडा खोल झाल्या आहेत. या ठिकाणावरून रस्ता ओलांडताना दुचाकी उसळली. त्यामुळे रोहिणी खाली पडल्या. याचवेळी मागून येणार्या ट्रकचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. भयंकर आरडाओरड झाली. मात्र, मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने काहीच कळले नाही. ट्रकचे मागचे चाक महिलेच्या पोटावरून गेल्याने यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

जवळच असलेल्या डॉ. म्हाला यांच्या पुष्पक हॉस्पिटलमध्ये त्यांना देण्यात आले. पण, वेळ निघून गेली होती. काकड यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 27 - 4590 तर ट्रकचा क्रमांक एमएच 31 सीबी 1912 आहे. घटनास्थळावर तातडीने पोलिस दाखल झाले. ट्रक चालक व ट्रकला ताब्यात घेण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचाही यावेळी फोडल्या. वाहतूक काहीवेळासाठी ठप्प झाली होती. या अपघातात दुचाकी चालक स्वप्नील यांना कोणतीही दुखापत झाली नाही . सादर महिलेचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. उमरी येथील डाळके यांची रोहिणी कन्या असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्ता बांधकाम करणार्या कंत्रादारावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे.