अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक जागीच ठार, एक गंभीर जखमी

January 28,2021

वर्धा : २८ जानेवारी - महामार्गाने जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील मयुर दिलीप चाफले (22) जागीच ठार झाला तर कुलदीपसिंग दर्शनसिंग जुनी (22) बेडगाव कामठी हा युवक गंभीर जख्मी झाल्याची घटना २७ जानेवारीला रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली.  

कागदी खर्डे खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा मयुर चाफले बाजारगाव येथे खर्डे घेऊन गेला होता. परत येतांना कारंजाकड़े येत असलेल्या कुलदिपच्या नवीनच दुचाकीवर बसून निघाला. कारंजापासून ४ किलोमीटर अंतरावरील नागलवाडी शिवारात मागून अज्ञात वाहनांने दुचाकीला जोरदार धडक दिली असता दोघेही महामार्गावर फेकल्या गेले. या धडकेत मागे बसलेल्या मयुरच्या डोक्याला जबर मार बसून तो जागीच ठार झाला. 

दुचाकीचालक कुलदिपसिंग सुध्दा गंभीर जख्मी झाला. घटना घडताच तातडीने जख्मीला कारंजा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. कुलदीप नागपूर जिल्ह्यातील कामठी जवळील बेडगावचा असून तळेगाव शा.पंत येथे सासुरवाडीला जात होता तर मृतक मयुर हा कारंजाला उतरणार होता. कारंजा येथील कस्तुरबा विद्यालयातील शिपाई दिलीप चाफले यांचा मयुर हा मोठा मुलगा आहे. ३० रोजी मयुरच्या बहिणीच्या साक्षगंधाच्या तयारीत कुटूंबीय असतांना मयुरच्या जिवघेण्या अपघाती निधनाने चाफले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.