पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - लोहमार्ग पोलिस स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार दीपक डोर्लीकर यांचा पोलिस दलातील उल्लेखनीय काम व प्रसंशनीय सेवेसाठी पोलिस महासंचालक पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. 

लोहमार्ग पोलिस मुख्यालयाच्या अजनी मैदानावर झालेल्या गणतंत्र दिन सोहळ्यात लोहमार्गचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते दीपक डोर्लीकर यांना या पदकांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी लोहमार्ग पोलिस नागपूर जिल्ह्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत सिंहल (अकोला) यांनाही महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. 

२०२० च्या महाराष्ट्र दिनी या पदकांची घोषणा करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर येथील गुन्हे शाखेत कार्यरत दीपक डोर्लीकर यांनी त्यांच्या २६ वर्षांच्या कार्यकाळात बिहार, हरियाणा, ओडिशा, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश यासारख्या अनेक राज्यात जाऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि अनेक जटील गुन्ह्यांचा छडा लावला. विशेष म्हणजे अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीला त्यांनी घाम फोडला. ओडिशाला जाऊन टोळीतील म्होरक्याला अटक केली. दारू तस्करांना सळो की पळो करून सोडले. मोबाईल चोरांनाही घाम फोडला. दीपक नाव घेताच चोरांना घाम फुटतो, अशी त्यांची ओळख आहे. 

आंध्रप्रदेशात एका पोलिस उपनिरीक्षकाचा खून करून पळून जाणाèया दोघांना त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर मोबाईलमधील छायाचित्राच्या आधारे जाळ्यात अडकविले होते. या कामगिरीसाठी त्यांना आंध्रप्रदेश पोलिस दलाचा पुरस्कारही जाहीर झाला होता.