नाग नदी सौंदर्यीकरण प्रस्तावाला अर्थमंत्रालयाने दिली मंजुरी

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - उपराजधानीतून वाहणार्या नाग नदीच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाला अर्थमंत्रालयाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे लवकरच सल्लागाराची नियुक्ती आणि निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले. 

नितीन गडकरी यांनी नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात दिल्लीत बुधवारी आढावा बैठक घेतली. या वेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 

नाग नदीचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरीही मिळाली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम थांबले होते. कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिल्याने सरकारने कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचे ठरविले होते. मात्र, आज नितीन गडकरी यांनी थेट अर्थमंत्र्यांशी बोलून हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मिळविली. याबाबत सल्लागाराची नियुक्ती करून निविदा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. 

नाग नदी प्रदूषणमुक्तकरून तिचे स्वरुप बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. नाग नदी प्रकल्पासाठी ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसाह्य करणार आहे. यासाठी ‘जिका’कडे 2500 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शहरातील नाग नदीच्या उत्तर व मध्य झोनमध्ये 500 किमी सिवर लाईन बदलण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये नागपुरातील पिवळी नदी आणि बोर नाल्याचेही शुद्धीकरण करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेने नाग नदी सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदी पात्राच्या दोन्ही बाजूच्या 15 मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने हटवण्यात येणार आहेत. नाग नदीची लांबी 16.732 किलोमीटर आहे.