पेंच नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - पारशिवनी तालुक्यातील घोगरा महादेव देवस्थान येथे पेंच नदीत गेल्या तीन दिवसात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. रविवार, २४ जानेवारी रोजी ११.३0 वाजतादरम्यान पोहत असताना एकाचा बुडून मृत्यू झाला. अनुराग शिवराद श्रीवास्तव (वय १३) रा. रावल अपार्टमेंट, प्लॉट नंबर ८, १0 नंबर पुलिया लष्करीबाग, नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तर २६ जानेवारीला सकाळी ११ वाजतादरम्यान पोहत असताना मृत्यू पावलेल्याचे नाव सागर हरीकिसन गिरी (वय २३) रा. बैलगाव, जि. नागपूर असे नाव आहे.

पेंच नदी घोगरा येथे पर्यटनस्थळ असून ठिकठिकाणावरून मोठय़ाप्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसाने या परिसरात जागोजागी डोह पडल्याने पोहणार्यांना पाण्याचा अंदाज नसतो. याच ठिकाणी यापूर्वीही अशा बर्याच घटना घडल्या असून तीन दिवसातील दुसरी घटना आहे. मृतक सागर हा आपल्या मित्रांसोबत प्रजासत्ताक दिनानिमित्त घोगरा येथे महादेव दर्शनासाठी गेला होता. या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. पाणी अधिक खोल असल्याचा अंदाज अनोळख्यांना नाही. त्यामुळे हौशी पर्यटकांना नकळत जीव गमावावा लागत असल्याचा क्रम सुरू आहे. येथे असणार्या काहींना सागर बुडत असताना दिसला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण, यश आले नाही. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानबा पळनाटे हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व सागरला पाण्याबरोबर काढून पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.