प्रजासत्ताक दिनाच्या परेडला जातानाच सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - प्रजासत्ताक दिनाच्या परेडला जाताना झालेल्या अपघातात सीआयएसएफचा जवानाचा मृत्यू झाला. जी. डी. रघुवंशी (वय ५९ रा. एअरपोर्ट कॉलनी), असे मृतकाचे नाव आहे. ते सीआयएसएफमध्ये हेडकॉन्स्टेबल व योग प्रशिक्षक होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी रघुवंशी दुचाकीने घरून निघाले होते. सोनेगाव परिसरातील घरापासून काही अंतरावरच दूधविक्रेत्याच्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ते जखमी झालेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारांदरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

रघुवंशी यांच्या मृत्यूने त्यांच्या पत्नी गौरी, मोठी मुलगी डॉ. नेहा व निधी यांना जबर धक्का बसला आहे. निधी ही वैद्यकीय अभ्यासक्रमाला आहे. फेब्रुवारी महिन्यात रघुवंशी निवृत्त होणार होते. उल्लेखनीय कार्यासाठी रघुवंशी यांना २००८मध्ये महासंचालक पदकानेही सन्मानित केले होते. मुंगेर विद्यापीठातून त्यांनी 'उस्ताद' ही पदवी प्राप्त केली. बुधवारी शासकीय इतामात त्यांच्यावर वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.