दिल्ली हिंसाचारात भाजप नेत्याचा हात - सखोल चौकशीची सुब्रमण्यम स्वामींची मागणी

January 28,2021

नवी दिल्ली : २८ जानेवारी - केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान जोरदार हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेच नुकसान तर झालंच शिवाय ३०० पेक्षा जास्त पोलीस देखील जखमी झाले. एवढच नाही तर आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढून त्या ठिकाणी तोडफोड करत, विविध झेंडे देखील फडकवले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं एक खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे पीएमओच्या जवळील भाजपा नेत्याचा हात आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भूमिका मांडली आहे.

 “एक चर्चा सुरू आहे, कदाचित त्यात काही तथ्य नसेल. ते खोटंही असू शकेल किंवा विरोधकांच्या आयटी सेलने वावड्या उठवल्या असतील की, पीएमओच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या भाजपाच्या सदस्यानं लाल किल्ल्यावरील हिंसाचारात लोकांना भडकवण्याचं काम केलं. त्यामुळे नीट तपासून माहिती घ्यावी.” असं सुब्रमण्यम स्वामी यांना ट्विटद्वार म्हटलं आहे.

या घटनेमुळे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिमा मलिन झाली आहे. देशाच्या प्रतिमेचंही नुकसान झालं असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, प्रजासत्ताकदिनी ‘ट्रॅक्टर मोर्चा’ला हिंसक वळण लागल्याने शेतकरी आंदोलनाला तडा गेला आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असून, शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीचा संसदेवरील नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आलेला आहे.