दिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

January 28,2021

नवी दिल्ली : २८ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केलीय. दिल्ली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची कारवाईही सुरू केली जाणार आहे. या अगोदर दिल्ली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 'शेतकरी नेत्यांचं दिल्ली पोलिसांसोबत झालेला करार का तोडण्यात आला? शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर मार्चमध्ये सर्वात पुढे असणं गरजेचं होतं. तसंच आंदोलनात केवळ ५००० ट्रॅक्टरला परवानगी देण्यात आली होती. ट्रॅक्टर मार्चची वेळ दुपारी १२.०० वाजताची निश्चित करण्यात आली होती. परंतु, त्यापूर्वीच ट्रॅक्टर मार्चला सुरूवात करण्यात आली. काही असामाजिक घटकांनी मंचावर कब्जा करून भडकाऊ भाषणंही दिली' असं म्हणतानाच यासाठी जबाबदार धरून शेतकरी नेत्यांवर कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत दिल्ली पोलिसांनी नोटीस धाडलीय. 

बुधवारी रात्री उशिरा या नोटीस अनेक शेतकरी नेत्यांनी ही नोटीस मिळाली. यामध्ये योगेंद्र यादव, बलबीर राजेवाल, बलदेव सिंह सिरसा, डॉ. दर्शनपाल या शेतकरी नेत्यांचाही समावेश आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी नेत्यांना तीन दिवसांचा अवधी दिला आहे. संरक्षित वास्तू असलेल्या लाल किल्ल्याजवळ झालेला हिंसाचार 'सर्वात निंदनीय आणि राष्ट्रविरोधी कृत्य' असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये दीप सिद्धू तसंच 'माजी गँगस्टर' आणि सद्य सामाजिक कार्यकर्ता बनलेल्या लक्खा सिधाना यांच्या नावाचाही समावेश आहे. भारतीय दंड संहिता (IPC) सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहचवणं तसंच अन्य कायद्यांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातन स्मारकं आणि ऐतिहासिक स्थळं तसंच अवशेष कायदा, शस्त्रास्त्र कायद्यानुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.